मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन ! (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर)
मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत सादर करीत आहोत.
प्रस्तुत निर्णयाच्यामागे शासनाने विविध विद्वानांची मते विचारात घेतली असावीत असे दिसते आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. अर्थात ह्या निर्णयाच्या विविध अंगांची योग्यायोग्यता ही आता यापुढे यावर व्यापक चर्चा घडल्यावरच मग लक्षात येईल.
शासनाच्या या आदेशपत्रामध्ये ’सध्याचे माहितीतंत्रज्ञानाचे युग’, ’शासकीय कार्यालयांचे संगणकीकरण’, ’वेगाने व विविधांगाने कामे होणे’, ’शासनाने काळाची पावले ओळखून’, ’महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार’, ’संगणक तंत्रज्ञानाचा मराठी भाषा व संस्कृती इत्यादींच्या विकासासाठी’, असे जड शब्दप्रयोग केले असले तरी प्रस्तुत निर्णय प्रकाशित करताना तो जागतिक स्तरावर प्रमाणभूत ठरलेल्या युनिकोड प्रणालीवर आधारित संगणकीय टंकात मुद्रित न करता त्याचे अप्रमाणित टंकनपद्धतीने मुद्रण करून व नंतर त्याची पीडीएफ धारिणी बनवून ती प्रसिद्धीस सादर केली आहे, यावरून शासनाच्या संगणकीकरणाच्या महत्त्वाकांक्षेबद्दलच्या गांभीर्याविषयी प्रगल्भतेविषयी व थोडी शंका वाटू लागते. शासनाच्या स्वतःच्या संकेतस्थळावर बहुतेक माहिती इंग्रजीतूनच उपलब्ध करून दिलेली आहे; मराठीतून फारच कमी माहिती उपलब्ध आहे. अर्थात आहे तीसुद्धा प्रमाणित युनिकोडानुकूल टंकात नसल्यामुळे बर्याचदा मराठीत उपलब्ध असलेली माहितीसुद्धा वाचणे शक्य होत नाही. राज्यभाषा मराठी व्यवस्थितपणे बोलू-वाचू-लिहू शकणार्या सामान्य नागरिकाला त्याच्या स्वतःच्याच राज्यात त्याचे स्वतःचे राज्यशासन माहितीपासून वंचित ठेवते यालाच लोकशाही पद्धतीचा भारतीय, निदान महाराष्ट्रीय नमुना म्हणायचा का?
मराठीतील मूळच्या लसणासारख्या (लुगड्यासारख्या?) गोल ल ऐवजी दंडासह ल, शेंडीफोड्या श ऐवजी डोक्यावर गाठ दिसणारा श, तसेच ऍ या वर्णास अ वर चंद्रकोर दाखवण्याऐवजी ए वर चंद्रकोर दाखवणे; असे बरेच गोंधळ हे शासनाच्या डोळे झाकून हिंदीचे शेपूट धरून चालण्याच्या हुजर्या प्रवृत्तीमुळे सुरू झाले व १०+२+३ च्या नवीन अभ्यासक्रमाच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमधून प्रथम अंतर्भूत केले गेल्यावर मग शाळांद्वारे व संगणकाद्वारे सर्वत्र पसरले. खरं म्हणजे ऍ व ऑ हे उच्चार, जे दूरदृष्टीने मराठीने भाषेत कधीच सामावून घेतले होते, ते हिंदीत अजुनही फारसे वापरले जात नाहीत. पण तरीही त्या विषयी हिंदी पंडितांचा निर्णय मराठीवर का लादून घेतला गेला हे समजत नाही. असो. स्वतःच केलेला गाढवपणा सुधारण्याची बुद्धी राज्य शासनाला उशीरा (पस्तीस वर्षांनी) का होईना पण आता तरी झाली ह्याबद्दल देवाचे आभार.
काही सूचना आम्हाला सुचल्या त्या अशा:
देवनागरी अंक आणि त्यांचे प्रमाणीकृत अक्षरी लेखन:
१००: शंभर -> योग्य
१०००: हजार -> सहस्र हा विकल्प द्यावयास हवा.
लाख/दहालाख -> लक्ष/दशलक्ष हे विकल्प उपलब्ध असावेत.
कोटी/दहा कोटी -> करोड ह्या इंग्रजी अपभ्रंशाचा विकल्प दिला नाही हे योग्यच आहे. पण शाळेत आम्ही दशकोटीसुद्धा म्हणत असू.
(एकम् स्थान, दहम्, शतम्, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज… इत्यादी).
या सूचनांचीही शासनाने दखल घ्यावी.
प्रत्येक मराठीभाषाप्रेमीने माहिती करून घ्यावी अशा या शासनादेशाची प्रत खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
शासनाच्या प्रस्तुत महत्त्वाच्या निर्णयाची माहिती श्री० सुशांत देवळेकर यांनी पाठवली आहे; त्यांचे मनःपूर्वक आभार.
आपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवावीत.
- अमृतयात्री गट
No comments:
Post a Comment